मुजफ्फरनगरमध्ये राहणारी एक महिला स्वादुपिंडाच्या कर्करोगानेग्रस्त (pancreatic cancer) होती. या महिलेला ७ एप्रिलला जेपी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी महिलेला दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया केली. यानंतर महिलेला सर्दी खोकल्यासह श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मग हॉस्पिटल प्रशासनाने महिलेची करोना चाचणी केली. चाचणीत महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टाफला धक्काच बसला.
घटनेची महिती मिळताच सीएमओचं एक पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. तसंच महिलेला ज्या मजल्यावर ठेवण्यात आलंय तो रिकामा केला गेलाय. तसंच महिलेवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, कर्मचारी आणि नर्स आणि तंत्रज्ञांना क्वारंटाइन केलं गेलंय. संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. यासोबतच रुग्णाची माहिती न देणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सोएमओ डॉ. एपी. चतुर्वेदी यांनी दिली.
नोएडात गेल्या तीन दिवसांमध्ये करोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. करोनामुळे जिल्ह्यातील २२ हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. या ठिकाणांवरील नागरिकांना आवश्यक तो पुरवठा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times