‘करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने सध्या महाराष्ट्र सुरक्षित स्थितीत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. कारण राज्यात आजच्या स्थितीला केवळ ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राने याआधी एकाच दिवशी ६५ ते ७० हजारापर्यंत रुग्णसंख्या बघितलेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक दशलक्ष लोकसंख्येमागे आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सध्या आपला आकडा खूप कमी आहे. मात्र केंद्र सरकारकडून ज्या काही उपाययोजना करण्यास सांगण्यात आलं आहे, त्या आपण तत्काळ करू,’ असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंसमोर मोदींनी आकडेवारीच दाखवली; राज्याचा व्हॅट कमी करण्यासाठी आग्रह
राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करणार?
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत माहिती दिली आहे. ‘राज्यात आता आपण करोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवणार आहोत. तसंच पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणं आणि त्यांच्यावर योग्य उपचार करणे, बाधित आढळणाऱ्या रुग्णांना करोनाच्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे हे तपासणं, महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या व्यतिरिक्त सध्यातरी दुसरा कोणता व्हेरिएंट आढळलेला नाही. लसीकरणाबाबत आपण केंद्राच्या सरासरीच्या जवळच आहोत. केंद्र सरकारने आता ६ ते १२ वयोगटातील मुला-मुलींना लसीकरणाची परवानगी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाचं मोठं काम आता राज्य सरकारसमोर आहे. आपल्याला शाळेत जाणाऱ्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण वाढवायचं आहे,’ असं टोपे म्हणाले.