जमिनीच्या फेरफारसाठी मागितली ८ हजारांची लाच
तक्रारदार यांची सावंगी येथे वडिलोपार्जित शेत जमीन आईच्या नावे आहे. मात्र, आईचा मृत्यू झाल्याने जमिनीवर बहीण आणि तक्रारदार यांचा वारसान हक्क आला होता. बहिणीद्वारे हक्क सोडण्याचे प्रमाणपत्र सादर करुन फेरफार करण्यासंबधी अर्ज देऊनही संबधित जमीन तक्रारदार याच्या नावे झाली नव्हती. ते का झाले नाही हे जाणून घेण्यासाठी तक्रारदार आमगाव तहसील कार्यालय गेले. तिथे आरोपी महिला अव्वल कारकुन यांनी फेरफार करुन देण्यासाठी तक्रारदाराला ८ हजार रुपयांची लाच मागितली.
सापळा रचून कारकूनला रंगेहात अटक
मात्र, तक्रारदाराने याची तक्रार थेट गोंदिया लाचलुचपत कार्यालयात केली. संबधित तक्रारीची शहानिशा करुन लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तडजोड रक्कम म्हणून ६ हजार रुपये स्वीकारताना आरोपी महिला कारकूनला अटक केली. त्यांच्यावर लाचलुचपत कायदा 1988 नुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात एका महिला लाचखोर कर्मचाऱ्याला अशा प्रकारे अटक झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे.