मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत आता १००८ करोनाबाधीत रुग्ण झाले आहेत (६४ मृत्यू मिळून). दुसरीकडे दाखल रुग्णांपैकी आणखी चार रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले २९२ नवीन रुग्ण दाखल झाले असून अशा रुग्णांची संख्या आता ४ हजार ३५ इतकी झाला आहे. मुंबईत आज करोनाबाधीत २१८ नवीन रुग्ण आढळले असले तरी त्यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये आता लक्षणे नाहीत. ते प्रतिबंधात्मक क्षेत्रातील करोना रुग्णांच्या सहवासीतांपैकी आहेत, असा दावा पालिकेने केला आहे. दिवसभरातील १० मृतांपैकी ९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, असेही पालिकेने नमूद केले आहे.
करोनाबाधीत ७७५ रुग्णांच्या संपर्कातील ४०२८ जणांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला असून त्यात ३८२ करोनाबाधीत आढळले आहेत. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले असून बहुतेक रुग्णांत आता लक्षणे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत करोनासाठीच्या १६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times