पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली माहिती चुकीची होती. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलवर अनुदान देत आहोत. त्यासाठी आम्ही १५०० कोटी खर्च केले आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. नरेंद्र मोदी राज्यांना कर कमी करायला लावत आहेत, मात्र आमचे केंद्रांकडे प्रलंबित असलेले ९७ हजार कोटी द्यावेत. त्यापैकी अर्धी रक्कम जरी दिली तरी आम्ही कर कमी करु, असं ममता बॅनर्जी म्हणाले. केंद्र सरकारनं आमचे प्रलंबित पैसे दिल्यास आम्ही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करु त्यासाठी ३ हजार कोटींचं अनुदान जाहीर करु, असं देखील त्या म्हणाल्या आहेत. आमचे पैसे केंद्राकडे प्रलंबित असताना सरकार कसं चालवणार असा सवाल देखील बॅनर्जींनी केला.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्यावतीनं केंद्र सरकारनं आमचे ९७ हजार ८०७.९१ कोटी रुपये द्यावेत, आम्ही पुढील पाच वर्ष पेट्रोल आणि डिझेलवरील सगळे कर रद्द करु असं म्हटलं आहे. नरेंद्र मोदीजी तुम्ही काय करु शकता हे आम्हाला पाहायचं आहे, असं देखील टीमएमसीच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. करोना बैठक असल्यानं पंतप्रधान मोदींना त्यावेळी उत्तर देता आलं नाही, असं देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारनं २०१४ पासून १७ लाख ३१ हजार २४२ कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा केला आहे. तुम्ही राज्य सरकारांना कर कपात करण्यासाठी सांगता तेव्हा ही बाब लोकांना का सांगत नाही, असा सवाल देखील ममता बॅनर्जींनी केला आहे.