म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वरळी परिसरात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग चिंतेत आहे. या भागातील करोना रुग्णांवर तातडीने उपचार करून या विभागातील करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने वरळीतील पोदार रुग्णालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था केली आहे.

प्रसिद्ध डॉ. लकडावाला यांच्या टीममधील १२ डॉक्टर व २४ नर्सेस यांची स्वतंत्र टीम या विभागात काम करणार आहे. करोना कक्षात सहा मिस्ट पंखे असून जंतुनाशक द्रव्य फवारणी करून २४ तास कक्षाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. या विभागात काम करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निर्जंतुकीकरण शॉवर शाफ्ट तयार करण्यात आले असून संबधित डाक्टर व नर्सेस आपली ड्युटी पूर्ण केल्यानंतर या शॉवरमध्ये स्वत:ला सुरक्षित करून बाहेर पडतील. या विभागात जी-दक्षिण विभागाचे १००हून अधिक कर्मचारी, अधिकारी तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहेत.

११४ कक्ष परिचर पदे भरणार

करोनावरील उपचारासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. मात्र रुग्णांच्या वाढत्या संख्येपुढे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे पालिकेने ११४ कक्ष परिचर पदे तातडीने भरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शुक्रवारी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन इच्छुकांना या भरतीसाठी आवाहन केले आहे. या पदासाठीचा १८ हजार ते ५७ हजार वेतन निर्धारित करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता दहावी पास असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here