म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील औषधांची दुकाने वगळता अन्य जीवनावश्यक सर्व वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दोन याच वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय पालक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, छाया रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आणि औषध तसेच अन्य वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना बैठकीत दिले आहेत. गुरुवारी अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरातील करोनाबाबतच्या व्यवस्था आणि उपाययोजनांची पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.

नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ, उल्हासनगर शहरांना गुरुवारी संध्याकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी अंबरनाथ येथील महात्मा गांधी शाळेतील परराज्यातील कामगारांना ठेवलेल्या व्यवस्थेची पाहणी केली तसेच त्यानंतर नगरपालिकेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, तहसीलदार जयराज देशमुख मुख्याधिकारी देविदास पवार यांच्यासोबत नगरपालिकेत बैठक घेत पुढील उपाययोजनांबाबत निर्देश दिले.

यावेळी नगरपालिकेकडून पालकमंत्र्यांकडे शहरातील पूर्व-पश्चिम भागातील ताप नियंत्रण कक्षात लागणारी औषधे, डॉक्टरांसाठी पीपीई किट, मास्क इत्यादी साहित्य खरेदीसाठी तसेच विलगीकरण कक्षातील साहित्य खरेदीसाठी आणि शहरातील निर्जंतुकीकरणासाठी औषधांचा पुरवठा करण्याकरिता एकूण एक कोटी १५ लाख रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे केली, मात्र सध्या अत्यावश्यक बाबीत छाया रुग्णालयासाठी दोन रुग्णवाहिका देण्याचे तसेच औषध आणि वैद्यकीय साहित्यखरेदीसाठी ४० लाख रुपयांचा निधी देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

तसेच, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील औषधांची दुकाने वगळता किराणा दुकान, भाजीपाला, फळे आणि दूध आदी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी दोन याच वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. पालकमंत्र्यांनी उल्हासनगर महापालिकेला भेट देत कॅम्प नंबर चार येथील प्रसूतीगृहातील कोव्हिड १९ रुग्णालयाची व्यवस्था पाहिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here