मुंबई : राज्यात सुरु असलेल्या सर्व घडामोडींवर शिवसेनेने (Shivsena) तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उद्या स्वत: खासदारांशी चर्चा करणार आहेत. मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे (Shivsena Meeting). मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आलं आहे.

वाचा – महाराष्ट्र दिनाला राज आणि उद्धव ठाकरेंची जुगलबंदी रंगणार, आंबेडकरांचाही शांती मोर्चा

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्यात सध्या राजकीय खलबतं सुरु आहेत. अशात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा वाद राज्यात पाहायला मिळतो आहे. या सगळ्यात आता मनसेनेही उडी घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

उद्या (२९ एप्रिल) मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

वाचा – राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार; मात्र ‘या’ असणार अटी-शर्ती

राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन होणारं राजकारण, मनसे प्रकरण, खासदार नवनीत राणा आणि रवी राणा प्रकरण, विरोधकांकडून होणारे हल्ले यासर्वांवर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की, लवकरात लवकर सभा घेऊन सर्व विरोधकांना उत्तर देणार आहे. मास्क काढून ते सभा घेणार आहेत. त्या सभेत सगळ्यांचा एकदाचा काय तो परामर्श आणि सोक्ष मोक्ष लावून टाकायचाय, असेही ते म्हणाले होते. येत्या १ मे रोजी उद्धव ठाकरेंची पुण्यात सभा आहे. ही बैठक म्हणजे त्या सभेची पूर्वतयारी असू शकते. १ मे रोजीच्या सभेबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here