जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर भर रस्त्यात तलवारीने वार केल्याची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नागेश दळवी व संदिप राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात प्रशांत बारजवळ हा प्रकार बुधवारी रात्री १२च्या सुमारास घडला.
असा घडला संपूर्ण प्रकार…
जखमी तरुण अजय शिरसाठ (वय २६) हा त्याच्या मित्रासोबत म्हसोबा चौकातून जात असताना नागेश व संदिप यांनी त्याला आवाज देऊन थांबविले. जुन्या वादाच्या रागातून त्यांनी अजयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संदिपने नागेशच्या हातातील तलवार घेऊन अजयच्या डोक्यावर वार केले. जखमी अजयवर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी नागेश व संदिप याच्याविरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी व त्यांचे मित्रास आवाज देत आणि थांबवून शिवीगाळ करून आरोपी संदीप राठोड याने नागेश दळवीचे हातातील तलवार घेवून फिर्यादीचे डोक्याचे डावे बाजुस मारून दुखापत केली आहे.