राजस्थानमध्ये सन २०१८मध्ये सत्तेत आल्यापासून अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. जुलै-ऑगस्ट २०२०मध्ये, तर पायलट यांनी काँग्रेसच्या १८ आमदारांना हाताशी धरून भाजपच्या मदतीने गहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी उघड बंडखोरी केली होती. त्यावेळी बंडखोर आमदारांचा वाद राजस्थान उच्च न्यायालयातही पोहोचला होता. पण, पायलट यांच्यासोबत असलेले बहुतांश आमदार गहलोत यांच्याकडे परत गेल्यामुळे पायलट यांचे बंड फसले आणि काँग्रेसमध्ये नामुष्की पत्करून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री राहिलेले पायलट हे गेल्या दोन वर्षांपासून कुठल्याही पदाविना राजस्थानच्या राजकारणात चाचपडत आहेत. गहलोत यांच्याविरोधातील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या आहेत.
दरम्यान, गहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून लगेच हटवले नाही, तर राजस्थानात काँग्रेसला पुन्हा सत्तेत येणे शक्य होणार नाही, असे सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना सांगितल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. पण, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी संबंधित वृत्तवाहिनीचे नाव घेऊन ऐकीव माहितीवर वस्तुस्थितीला धरून नसलेल्या वृत्तावरून कानपिचक्या देणारे ट्वीट करीत पायलट यांच्या संभाव्य बंडाळीतील हवाच काढून टाकली.