केतन जोशी

ट्विटरच्या ऑफिसमध्ये गमतीत म्हटले जाते, की त्यांच्या जगात रोज नवीन कथा जन्माला येत असतात, नवीन नायक जन्माला येत असतात. त्या नायकांना कधी डोक्यावर बसवले जाते, तर कधी पायदळी तुडवले जाते. कित्येकांचा मानसिक छळ केला जातो. हे सगळे होताना, ट्विटरच्या ऑफिसमध्ये बसलेल्या कोणीच त्या ‘स्टोरी’चा भाग व्हायचे नाही आणि नायक होण्याचा तर विचारही करू नये. ट्विटरला आता एक नवीन मालक मिळणार आहे, जो ट्विटरने घातलेले अनेक नियम पायदळी तुडवायला निघाला आहे आणि हे करताना स्वतः नायक न होण्याचा नियम तर त्याला कधीच मान्य होणार नाही. हे ४४ बिलियन डॉलर (तीन लाख ३८ हजार कोटी रुपये) इतकी अवाढव्य रक्कम मोजून ट्विटरवर ताबा मिळवायला निघाले आहेत. जगातील एक बलाढ्य आणि विश्वासार्ह मानले जाणारे समाजमाध्यम अशा एका व्यक्तीच्या ताब्यात जाणार आहे, जिला नैतिक, सामाजिक संकेतांच्या चौकटीच मान्य नाहीत.

ही बातमी गेले काही दिवस भारतीय माध्यमांमध्येही चर्चेत आहे; पण ट्विटरचा सीईओ भारतीय असल्याने त्याचे काय होणार आणि ४४ बिलियन डॉलरच्या व्यवहाराने विस्फारलेले डोळे, या पलीकडे भारतीय माध्यमे जायला तयार नाहीत. पाश्चिमात्य जबाबदार माध्यमे मात्र या सगळ्याकडे पूर्ण वेगळ्या नजरेने बघत आहेत. त्यांचा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यावा लागेल; कारण ट्विटरची मालकी आल्यावर मस्क जे करू इच्छितात, त्यात भारतीय समाजही भरडला जाणार आहे, हे नक्की.

प्रसिद्धी मग ती कशीही मिळो आणि त्यासाठी कितीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल, असे मानणारे मस्क आता ट्विटरचे मालक होणार आहेत. ते एका बाजूला म्हणतात, की माझ्या कट्टर विरोधकांनादेखील ट्विटरवर स्थान असेल; पण एका ग्राहकाने ट्विटरवरून टीका केल्यामुळे, त्या ग्राहकाची ‘टेस्ला मोटर’ची मागणी रद्द करणारे मस्कच आहेत. आज त्यांच्याकडे साडेआठ कोटींहून अधिक अनुगामी आहेत आणि ते त्यांचे डिजिटल जगातील सैन्य आहे. हे सैन्य अत्यंत निर्दयीपणे मस्क यांच्या विरोधकांवर ट्विटर हल्ले करते आणि मस्क ही सगळी मजा बघत असतात. आधीच्या फेसबुक आणि आता मेटाचा मालक मार्क झुकरबर्ग किमान समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल आणि द्वेषाबद्दल नक्राश्रू तरी ढाळतो. मस्क या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. त्यांना हा फलाट मुक्त करायचा आहे. इथे त्यांना कोणतीही बंधने, सेन्सॉरशिप नको आहे. एखाद्याची मांडणी कितीही विषारी असू दे, ते त्याचे मत आहे आणि त्याला ते व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे मस्क मानतात. यामुळे पाश्चिमात्य माध्यमे चिंतेत आहेत; कारण ट्विटरवर वाट्टेल तसे व्यक्त होण्याची संधी मिळाली, की पुन्हा झुंडीच्या झुंडी चुकीची माहिती घेऊन धडकणार आणि अनेक संयत आवाज दाबले जाणार.

यापुढे ट्विटरवर तुम्हाला राहायचे असेल किंवा यायचे असेल, तर तुमची ओळख पटवावी लागेल, असे मस्क यांचे म्हणणे आहे. यालाही अमेरिकेत विरोध आहे. तुमची ओळख पटवावी लागणार, म्हणजे तुमची माहिती ट्विटरच्या मालकीची होणार आणि पक्के व्यवसायिक असणारे मस्क व त्यांचे नवीन व्यवस्थापन ही माहिती विरोधकांना कशावरून देणार नाहीत? यावरूनच अॅमझॉनचे, ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे मालक जेफ बेझोस मस्क यांना प्रश्न विचारतात, ‘आता चीनला ट्विटरच्या जगात झुकते माप मिळणार का?’ मस्क यांना हा टोला अशासाठी होता; कारण त्यांच्या ‘टेस्ला मोटर्स’चे भवितव्य चीनशी निगडीत आहे. व्यवसायासाठी कोणतीही तडजोड करणारे मस्क चीनला झुकते माप देतील, अशी भीती तिथल्या माध्यमांना आहे.

एका माजी अध्यक्षाने द्वेष पसरवणारी ट्विट केल्याने दंगल घडली, म्हणून ट्विटरने त्यांच्यावर कायमची बंदी घातली; पण ते ट्विटर आणि ती अमेरिका ही मुळात निराळी आहे. आता ट्विटरवर कोणालाच कायमचे तडीपार करता येणार नाही, या मस्क यांच्या वाक्याने अमेरिकन माध्यमे धास्तावली आहेत. डोनाल्ड ट्रम्प ‘मला ट्विटरवर परत यायची इच्छा नाही,’ असे म्हणत असले, तरी मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी पूर्णतः आल्यावर ट्रम्प परत येतील आणि पुन्हा एकदा गरळ ओकू लागतील, अशी सार्थ भीती सध्या अमेरिकेत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे, मस्क यांच्याकडे ट्विटरचा ताबा येणार, असे दिसू लागल्यावर रिपब्लिकन सिनेटरच्या ट्विटर समर्थकांच्या संख्येत ७४ टक्क्यांनी वाढ झाली, तर डेमोक्रॅट्सच्या संख्येत फक्त सात टक्क्यांनी. यावरूनच ट्रम्प यांची पिलावळ पुन्हा डोके वर काढेल, ही भीती सार्थ आहे, असे म्हणावे लागते.

या सगळ्यात अमेरिकन माध्यमे आडून एक प्रश्नाकडे बोट दाखवत आहेत. तो म्हणजे मस्क यांचे एक विधान. ते म्हणतात, ‘मी ट्विटरकडे पैसे कमावण्याचे साधन म्हणून बघत नाही.’ त्यांनी समाजमाध्यमांतील एक विश्वासार्ह माध्यम असलेले ट्विटर ४४ बिलियन डॉलर इतक्या अवाढव्य रकमेला विकत घेतले आहे. कदाचित ट्विटरमधून थेट पैसे कमावणे हा त्यांचा उद्देश नसला, तरी ‘टेस्ला मोटर्स’ आणि त्यांच्या इतर कंपन्यांना या माध्यमातून फायदा पोहोचेल, हे कशावरून बघितले जाणार नाही?

अमेरिकेत ४४ बिलियन डॉलर या रकमेची फारशी चर्चा नाही. मस्क हे दोन वेळा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन परतले आहेत. त्यांना आर्थिक धोके पत्करण्याची सवय आहे; पण प्रश्न आहे, की या गुंतवणुकीचे ते नक्की काय करतात? मस्क हे मुक्त भांडवलशाहीचे अस्सल प्रतीक आहेत. नफा आणि तोट्याचा खूप पुढचा विचार त्यांनी नक्की केला असणार. त्यांना ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’चा मान मिळाला, तेव्हाच ते काही तरी अजब करणार, याची कुणकुण लागली होती. मस्क यांना इतर माध्यमे झोडत असताना अपेक्षेप्रमाणे ‘टाइम’ साप्ताहिकाने मात्र त्यांची बाजू लावून धरली.

आज अमेरिकचे अध्यक्ष जो बायडेन कितीही म्हणत असले, तरी गुगल, फेसबुक, ट्विटर यांच्या मालकांना ते लगाम घालू शकत नाहीत, हे वास्तव आहे. इस्राईलने पेगॅसस हे अस्त्र वापरले, तसे मस्क ट्विटरवरचे स्वातंत्र्य आणि डेटा ही अस्त्रे वापरून ‘टेस्ला’ मोठी कशावरून करणार नाहीत? मोजके युरोपीय देश वगळता मस्क यांना कोणीच आवरू शकत नाही, असा सूर अमेरिकन माध्यमांमध्ये आहे. भारताविषयी फारसे कोणी बोलत नसले, तरी हवा तसा उन्माद घालायला मिळणार असेल, तर भारतात तरी त्यांना कोण कशाला अडवणार म्हणाṆ!

जॉन डी रॉकफेलर यांच्याविषयी म्हटले जायचे, की जग ज्याच्यावर चालते ते मुबलक असणारा हा जगातील सगळ्यांत श्रीमंत माणूस. आता मस्क यांच्याविषयी म्हणता येईल, की जग ज्या कथनावर चालते, ते कथन ताब्यात ठेवणारा हा जगातील नवश्रीमंत माणूस.

(लेखक समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here