नागपूर : ‘तुमच्याघरी कुणाला ताप आहे का, कुणी परदेशातून आले आहे का’, असे त्या कर्मचाऱ्यांनी विचारायचा अवकाश… त्यांच्यावर त्या घरातून गरम पाणी फेकले गेले. कर्मचाऱ्यांनी त्यातून कशीबशी सुटका केली. दुसऱ्याच गल्लीत आलेल्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याने त्यांची धावपळ उडाली. करोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, म्हणून जिवावर खेळत सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना या अनुभवांना रोजच सामोरे जावे लागत आहे.

करोनापासून नागरिकांना कोसोदूर ठेवण्यासाठीच मनपाची आरोग्य यंत्रणा चोवीस तास सक्रिय आहे. जे आरोग्य विभागाचे नाहीत, ज्यांचा या विभागाशी संबंध नाही, असे कर्मचारीही शहराच्या सुरक्षेसाठी झटत आहेत. मात्र, काही खोडसाळ नागरिक व अपप्रवृत्ती या चांगल्या कामात अडथळे आणत आहेत. मोमिनपुरा व सतरंजीपुरा भागात अशा काही घटनांमुळे सर्वेक्षणातील कर्मचारी अक्षरक्ष: रडकुंडीस आले आहेत. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी काही अनुभव सांगताना या मोहिमेतील अडचणीही पुढे केल्या.

अत्यल्प व्यवस्थेतही या भयंकर संकटाशी दोन हात करण्यासाठी मनपाची आरोग्ययंत्रणा तातडीच्या हालचाली करीत आहे. चार दिवसांपूर्वी मोमिनपुरा भागात रात्री एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तातडीने यंत्रणा रात्रीच कामाला लागली. त्यानंतर सतरंजीपुऱ्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. येथेही लगेच टीम दाखल झाली.

गुरुवारी रात्री पुन्हा सहा पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यावर रात्रीच मनपाची टीम सतर्क होऊन परिसरात दाखल झाली. मात्र, एवढी धावाधाव करून टीमला अत्यंत वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अशातही टीमकडून नागरिकांना विश्वासात घेत ‘तुमच्यासाठीच हे सर्व आहे’, असे सांगण्यात आले, माहिती विचारण्यात आली. तरीही, अनेकजण माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

आता करताहेत चूक कबूल

काहीजण आपले नाव चुकीचे नोंदवत असल्याचे पुढे आले आहे. सर्वेक्षणातील कर्मचाऱ्यांना अनेकजण सहकार्य करीत नाहीत. कर्मचाऱ्यांनी अशांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आपली बरोबर नावे सांगितली. चूक झाल्याचे कबूलही केले, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

घरातूनच सुरू होते शिवीगाळ

करोनासंदर्भात विविध प्रश्नावली आहे. घरी कुणी आजारी आहे का, परदेशातून कुणी आले का वा असे कुणी संपर्कातील आहेत का, या प्रश्नांसोबतच ‘घरचे कुणी दिल्लीत गेले होते का?’ हा प्रश्न विचारला की समोरचा माहिती देणारा संतापून जातो. दुसऱ्याच क्षणात शिवीगाळ सुरू होते. परंतु, नंतर त्यांना शांतपणे समजावून सांगितल्यावर माहिती दिली जात आहे, असे अनुभवही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here