Painted Stork : सध्या राज्यात उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे सांगोला तालुक्यात जलाशयाची पातळी कमी होत आहे. पाण्याची पातळी कमी झाल्याने सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथील माण नदीपात्रात पेंटेड स्टोर्क अर्थात चित्रबलाक पक्षाचे थवेच्या थवे येत असल्याचे चित्र दिसत आहे. हे पेंटेड स्टोर्क अन्नाच्या शोधात माण नदीपात्रात आले आहेत.

दरम्यान, चित्रबलाक पक्षाचे थवेच्या थवे सध्या अन्नाच्या शोधात आल्याने परिसर पक्षांनी फुलला आहे. नदीकाठचा हा परिसर पक्षीप्रेमींना आकर्षित करत आहे. पेंटेड स्टोर्क हा आशिया खंडातील पाकिस्तान, श्रीलंका, भारत या देशात आढळणारा पक्षी आहे. बगळा, रोहित पक्षी, करकोचा, आयबीस असे सर्व परिचित असणारा पक्ष्यांच्या कुळातील हा पक्षी आहे.


 
दरवर्षीप्रमाणे चित्रबलाक हे पक्षी सांगोला तालुक्यातील बहुतांश जलाशयावर आढळून येतात. जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर मोठ्या संख्यने चित्रबलाक पक्षी मासे खाण्यासाठी येत असतात. सांगोला तालुक्यातील वाढेगाव याठिकाणी माण नदीच्या पात्रात मार्च ते मे या दरम्यानच्या काळात पाण्याची पातळी कमी झाल्याने खूप मोठ्या संख्येने पक्षी एकत्र येतात. त्याचबरोबर चमचे, शेकाट्या,  बगळे, पानलावा, प्रीत, खंड्या इत्यादी पक्षीही मोठ्या प्रमाणात एकत्र वावरताना याठिकाणी दिसत आहेत. हे दृश्य खूप विलोभनीय दिसत आहे. सांगोला शहराच्या आसपास असलेल्या चिंचोली तलाव,  ब्रह्मओढा  याठिकाणीही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दरवर्षी मार्च ते मे या काळात पाहायला मिळतात. पेंटेड स्टोर्क  हे पक्षी प्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची असते. टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा असतो. त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here