कोल्हापूर: जिल्ह्यात शनिवारी करोनाचा सहावा रुग्ण वाढल्याने खळबळ उडाली. दिल्लीत झालेल्या ‘तबलिगी जमात’च्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या तरुणाच्या संपर्कात आल्यानं एका ४६ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्या तरुणानं अनेक गावांना भेटी दिल्याचं समोर आल्यानं चिंता वाढली आहे.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडीतील उचत गावच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तरुणानं तालुक्यातील सात ते आठ गावातील नागरिकांना भेटी दिल्या आहेत. तालुक्यातील सरूड, बांबवडे, मलकापूर, कापशी, शाहूवाडीमध्ये त्याचा जास्त वावर होता. आता बाधित झालेली महिला त्या तरुणाच्या संपर्कात आली होती.

संबंधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. मिरज येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हे नमुने पाठविले होते. त्यातील ९२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत तपासणी झालेल्यांपैकी ३७४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अनेक नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्यानं जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील खेड्यात करोना पोहचल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here