जिग्नेश मेवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ट्विट केल्यामु १९ एप्रिला अटक केली होती. गुजरातच्या पालनपूर शहरातून त्यांना अटक करण्यात आली होती. आसाम पोलिसांनी अटक करुन कोकराझार येथे आणलं होते. ट्विट प्रकरणात मेवानी यांना २५ एप्रिलला जामीन मिळाला होता. मात्र, त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला कथित मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मेवानी यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
जिग्नेश मेवानी यांचे वकील अंघसुमन बोरा यांनी यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. आसाममधील बारपेटा जिल्हा कोर्टानं जिग्नेश मेवानी यांना जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याला कथित मारहाण प्रकरणी जामीन मंजूर झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर ३० एप्रिलला त्यांची सुटका करण्यात येईल, असं देखील बोरा यांनी सांगितलं.
आसाम पोलिसांच्या सोबत गुवाहटी विमानतळावरुन कोकराझार येथे जात असताना जिग्नेश मेवानी यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मेवानी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २९४, ३२३, ३५३ आणि ३५४ नुसार गुन्हा दाखल केला होता.
आसाम काँग्रेसच्यावतीनं जिग्नेश मेवानीच्या अटकेविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी भाजपवर टीका केली होती. जिग्नेश मेवानी यांच्या अटकेवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आसाम सरकार आणि मोदी सरकारवर टीका केली होती.