: धुळीचे वादळ, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला. वादळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. वादळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे नुकसान झाले असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेली दोन दिवस कडक उन्हामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पारा ४० च्या पुढे चालला होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास आभाळ काळ्या ढगांनी व्यापून गेले आणि मग सुरू झाले धुळीचे वादळ. संपूर्ण कोल्हापूर शहरावर धुळीच्या वादळाची चादर पसरली होती. पत्रे, प्लास्टिक कागद, पिशव्या वादळाने भिरकावून दिल्या.

अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. कसबा बावडा, शिवाजी पार्क, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, टाकाळा रुईकर कॉलनी इथे झाडांच्या फांद्या पडल्या. कसबा बावड्यातील रणदिवे गल्ली आणि सासणे ग्राऊंड परिसरात मोठी झाडं पडल्याची माहिती वर्दी अग्निशामक दलाला मिळाली आहे. झाड मुळासकट उन्मळून पडल्याने कारचे हे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि कडाडणार्‍या विजांमुळे जोरदार पावसाला सुरुवात झाली. गारांचा पाऊस पडला. गारा वेचण्यासाठी बच्चेकंपनीने रस्त्यावर गर्दी केली होती. ज्योतिबा पन्हाळा या ठिकाणी मोठा पाऊस झाला तर जोतिबा डोंगरावर पाण्याचे लोट वाहत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here