रमजानच्या महिन्याची प्रतीक्षा मुस्लीम व्यक्ती वर्ष भर करत असतो. सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांच्या व्यवसायाचं काय होणार याची काळजी आहे. औरंगाबादच्या जनतेला माझं आवाहन आहे की सर्वजण मिळून सोबत जाऊया. सर्व समाजातील ९९ टक्के लोकांना शांततेच्या मार्गानं जायचं असतं. १ टक्के लोकांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावं, असं इम्तियाज जलील म्हणाले.
भोंग्याबाबत सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. हिंदू आणि मुस्लीम असा मुद्दा नाही. हिंदुत्त्वाचं रक्षण कोण करणार यासाठी तीन पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. भाजप, मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. तीन पक्ष मैदानात उतरल्यावर कोणतं तरी लक्ष्य पाहिजे त्यासाठी मुस्लीम समाजाला लक्ष्य केलं जातं, असं इम्तियाज जलील म्हणाले.
औरंगाबादच्या जनतेनं कोणतीही भीती बाळगू नये. एका राजकीय पक्षाचे नेते येत आहेत, त्यामुळं चिंता करु नका. बाजार पेठेतील दुकानदारांना त्यांच्या मालाचं काय होणार ही चिंता लागली आहे. राज ठाकरे हे आमचे पाहुणे आहेत. ते आम्ही दुश्मन नाहीत. त्यांनी यावं सोबत इफ्तार करावं आणि सभेत जाऊन त्यांना जे बोलायचं आहे ते बोलावं, असं इम्तियाज जलील म्हणाले.
औरंगाबादचा खासदार असल्यानं मी अनेक ठिकाणी दिवाळीचा फराळ खायला जातो. त्यामुळं मी देखील आमंत्रण देतो. इदगाहच्या नमाजनंतर शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी यावं, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं. मनसे विरोधात बोलू नका, असा निर्णय स्थानिक पातळीवर मी घेतला होता. पण, तो निर्णय असदुद्दीन ओवेसी घेतल्याच्या बातम्या चालवल्या गेल्या, असं जलील म्हणाले.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर आणखी लोक येतील मात्र औरंगाबादमधील एकता आणि शांतता अबाधित राहावी, असं इम्तियाज जलील म्हणाले. आमच्या सभेत आम्ही कोणत्याही धर्माविरोधात बोलणार नाही, असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत.