सध्याच्या राजकीय स्थितीत काय करणं आवश्यक आहे यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या मतदारसंघातील प्रश्न समजून घेतले आहेत. महाराष्ट्रात जे काही सुरु आहे, त्यावर चर्चा केली आहे. उद्धव ठाकरेंनी प्रवक्त्यांना आणि खासदारांना सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या आणि प्रवक्त्यांच्या बैठकीचं सूत्र हे संघटना बांधणी, संघटना विस्तार हे होतं. आजच्या बैठकीत १४ मेची सभा, शिवसंपर्क अभियान आणि ८ जूनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यातील सभा यावर चर्चा झाली आहे, असं संजय राऊत म्हणाले. अयोध्येला आम्ही जाणार आहोत. प्रभू श्रीरामाचं आणि आमचं नातं हे राजकीय नातं नसल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्रात १ मे रोजी १२ सभा होणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेनं हिंदुत्त्वासाठी त्याग केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला होता. इतका मोठा त्याग हिंदुत्त्वासाठी कुणी केला नाही. हिंदुत्त्वावर कुणी बोलावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्त्वाची खरी रक्षक असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
भाजपकडून ओवेसींना मुस्लीम मत कापण्यासाठी उतरवलं जातं. तसं, हिंदू ओवेसींवर तो प्रयोग उलटेल, असं संजय राऊत म्हणाले. हिंदू ओवेसी कोण आहे हे समाजाला माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सेनेचे नेते, प्रवक्ते आणि खासदार उपस्थित होते.