२०१५ पासून प्रमोद चौघुले यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यश अपयशांच्य गर्तेत अडकलेला या संघर्षयोध्याने अखेर यावर्षी यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. आता ते थेट राज्यातून पहिले आले आहेत.
हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता असं प्रमोद सांगतात. करोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे करोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटे अभ्यास करत होते. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवलं आहे. प्रमोदचे वडील टेम्पो चालवतात तर आई शिवणकाम करते. घरी अर्धा एकर शेती. अशा हालाकीच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत करून प्रमोद चौघुलेने यशाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, कोव्हिड साथीमुळे या प्राथमिक परीक्षेला विलंब झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. मात्र, राज्य लोकसेवा आयोगाने त्यानंतर वेगाने पावले टाकली. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा संपली. एप्रिलमध्ये मुलाखती पार पडल्या.
मुलाखतींनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल लागण्याची परंपरा होती. ती परंपरा खंडीत करत मुलाखत संपताक्षणीच निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर होताच प्रमोदच्या मित्राने त्याचं स्वागत केलं आणि एकच जल्लोष केला. यावेळी प्रमोद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.