पुणे : सायकल रिपेअरिंचे काम करणाऱ्याच्या मुलाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ३६ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असतानाही पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) शिकणाऱ्या राहुल बडगुजरने ही कामगिरी केल्याने, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Pune News Updates)

‘राहुल आयटी शाखेचा विद्यार्थी असून, त्याला ‘डाटा इनसाइट्स’ या कंपनीने नोकरीची ऑफर दिली आहे. राहुलची ‘डाटा इनसाइट्स’ कंपनीकडून ‘सॉफ्टवेअर इंजिनीअर’ या पदासाठी निवड झाली आहे,’ अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे व पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरात आता पाण्यासाठी भरारी पथके

राहुल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून, सिन्नर तालुक्यातील माळेगाव गावाचा रहिवासी आहे. राहुलच्या वडिलांचे सायकल रिपेरिंगचे दुकान आहे, तर आई ‘एमआयडीसी’मधील छोट्या कंपनीत कामगार आहे. त्याचा भाऊ ड्रायव्हर आहे. कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर आपण प्रतिकूल परिस्थितीमधूनदेखील मोठे यश मिळवू शकतो, हे राहुलने दाखवून दिले आहे. ‘अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ऑनलाइन प्रोग्रॅमिंगच्या स्पर्धांमध्ये नियमित भाग घेत होतो. अभ्यासक्रमातील विषयांव्यतिरिक्त इंटर्नशिप केल्यामुळे कंपनीतल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने माझे प्रॅक्टिकल ज्ञान वाढले. त्याचा मला खूप फायदा झाला,’ असे मत राहुलने व्यक्त केले. ‘शिकत असतानाच एका अमेरिकन कंपनीत गेली दीड वर्षे ऑनलाइन इंटर्नशिप केल्याचा मला प्रचंड फायदा झाला. या काळात; तसेच प्रत्येक महिन्याला ८० हजार रुपये स्टायपेंड मिळत होता,’ असे राहुलने सांगितले.

दरम्यान, पीसीईटी-नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे दर वर्षी ३५० कंपन्यांद्वारे विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. पीसीईटी-नूतन ग्रुपच्या अंतिम वर्षातील एक हजार ५८७ विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत एक हजार ५४३ नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या आहेत, अशी माहिती डॉ. रवंदळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here