बीड : बीड जिल्हावासियांसाठी जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला होणार आहे. येत्या 7 मे रोजी हा रेल्वेमार्ग खुला होणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले. आष्टीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी ट्विटर वरून दिली आहे..

बीड जिल्हावासियांच्या दृष्टीने जवळच असलेल्या नगर-परळी-बीड रेल्वे मार्गावर येत्या 7 मे रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु होत असून याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रीतम मुंडे तसेच नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा आष्टीमध्ये होणार आहे

मागच्या तीन ते चार महिन्यापासून आष्टी-नगर रेल्वेचे उद्घाटन होणार कधी याविषयी चर्चा होत होती. मात्र आता या संदर्भातला मुहूर्त निघाला असून याची माहिती स्वतः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

नगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील महिन्यात या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरु होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते.

नगर-बीड-परळी रेल्वेचा प्रश्न कायम राहिला चर्चेत
नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुका सुद्धा या रेल्वे मार्गच्या प्रश्नाभोवती फिरताना पाहायला मिळाल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अगदी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती. आजपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद झालेली आहे.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल  परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. 1995 साली या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे काम रखडले. सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढे गेला असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

नगर आष्टी रेल्वे मार्गाची चाचणी
अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान 7 किमी अंतरावर मार्च 2018 रोजी 7 डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती. नंतर अहमदनगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्यांची रेल्वे चाचणी झाली. मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली.

नगर ते आष्टी सहा थांबे
अहमदनगर ते आष्टी 67 किलोमीटर अंतर असून या दरम्यान ही रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे. यामध्ये प्रथम नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी, धानोरा, कडा आणि आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. आष्टी तालुक्यातील पाच आणि नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर लवकरच तिकीटगृह सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ होणार आहे.

आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड कर्जत, पाटोदा, शिरुर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे-मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसंच व्यापारी वर्ग यांना मुंबई, पुणे, दिल्ली, इंदूर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा फायदा होईल. यामुळे उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here