मनसेच्या स्थापनेला इतकी वर्ष झालेली असताना तुम्ही मशिदीवरील भोंग्यांबाबत आताच इतकी आक्रमक भूमिका का घेत आहात, असा प्रश्न राज ठाकरे यांना एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी कधीही या प्रश्नावर बोललो असतो तरी तुम्ही आताच का, असं विचारलं असतं. खरंतर या प्रश्नावर मी आता पहिल्यांदाच बोलतोय असं नाही. याआधीही मी मशिदीवरील भोंगे हटवले पाहिजेत, अशी मागणी केली आहे. ठाण्यात झालेल्या सभेत मी त्याबाबतचा व्हिडिओही दाखवला आहे,’ असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे.
मी या भोंग्यांना आता हनुमान चालिसाचा पर्याय दिला आहे आणि हीच गोष्ट सर्वांना झोंबत आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीकाकारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांचा त्रास सर्वच जाती-धर्मातील लोकांना होतो, म्हणून ते हटवले गेले पाहिजेत, ही आमची मागणी कायम असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्याबाबत मनसेची आक्रमक भूमिका यापुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत.