सोलापूर : ‘स्वतःचे १४ आमदार टिकवता आले नाहीत. नाशिककरांनी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली. मात्र, तिथंही तेच… त्याच नागरिकांनी त्यांना नाकारले. आता हेच लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही खटाटोप करत आहेत. हे आपणाला परवडणारे नाही अशांपासून तुम्ही सावधान रहा’ या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
‘यूपी सरकारने निर्णय घेतला असेल. न्यायालयाने सकाळी ६ रात्री १० परवानगी दिली आहे. मग फक्त मशिदीवरचे भोंगे बंद होणार नाहीत. तर गावाकडं हरिनाम सप्ताह, भजन कीर्तनं, वाघ्यामुरळी कार्यक्रम असतात. हेदेखील बंद होतील. हेच भोंगावाले मागच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या बाजूने सभा घेत फिरत होते. काय झालं कुणास ठाऊक. त्यांनी आता उलटी पाटी लावली आहे. त्यांच्यामुळे राज्यातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येणार आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवा’ असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.