म. टा. वृत्तसेवा । नाशिकरोड: करोना विषाणूचा संसर्ग झाल्याच्या भीतीमुळे नाशिकरोडमधील प्रतीक राजू कुमावत (वय ३१) रा. श्रीकृष्ण कॉलनी, चेहेडी पंपिंग स्टेशन या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

प्रतीक कुमावत हा प्लंबिंगचे काम करीत असे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून घसा दुखत असल्याने त्याला करोना संसर्गाच्या संशयाने घेरले होते. चेहेडी पंपिंग स्टेशन येथील एका खासगी डॉक्टरांकडे त्यानं उपचारही घेतले होते. परंतु, शनिवारी सकाळी अचानक त्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. घरातील लोखंडी पाईपला साडी बांधून त्यानं गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली असून करोनाच्या आजाराच्या भीतीमुळं आत्महत्या केल्याचं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती राजू भिवसन कुमावत यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मयत प्रतीक कुमावत याचा मृतदेह पालिकेच्या बिटको रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस हवालदार ए. एम. गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here