ताप, सर्दी, तसेच इतर कोणतीही लक्षणे असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे पालिकेतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी पालिकेने प्रभाग अधिकारी, फिजिशिअन्स तसेच या भागातील डॉक्टरांना बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १७ ते २४ एप्रिल या कालावधीमध्ये २९४ रुग्णांची नोंद झाली आहे. करोना संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरीही धोका अजूनही टळलेला नाही, याकडे आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
प्रत्येक आठवड्याला वैद्यकीय निरीक्षण
पालिका प्रशासन प्रत्येक आठवड्याला रुग्णसंख्या कशी वाढते, याकडे लक्ष देत आहे. या संख्येमध्ये अचानक वाढ झाली, तर ती रुग्णसंख्या तातडीने नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासह चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असलेल्या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे, तसेच ज्या रुग्णांची लक्षणे काही दिवसांपासून कायम आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना दिल्या आहेत.