‘राजकीय सभा आणि कार्यक्रम लोकशाहीत सुरूच असतात. कायदा आणि सुव्यवस्था तसंच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचं पोलिसांचं काम आहे. यादृष्टीने संपूर्ण पोलीस विभाग तयारी करत आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, अशी अपेक्षा आहे. अशी काही घटना घडल्यास त्याला सामोरं जाण्यास पोलीस तयार आहेत. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी माझी विनंती आहे,’ असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना नोटीस पाठवली?
राज ठाकरे यांनी धार्मिक मुद्द्याला हात घातल्याने तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून राज ठाकरेंना सभेपूर्वी नोटीस पाठवण्यात आली आहे का? असा प्रश्न गृहमंत्री वळसे पाटील यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, अशी कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही, मात्र राज ठाकरे यांच्या सभेला अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे आजच्या भाषणात राज्यातील सत्ताधाऱ्यांचा कसा समाचार घेतात आणि मशिदीच्या भोंग्यांबाबत पक्षाचं आगामी काळात नेमकं काय धोरण जाहीर करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.