मुंबई : शिवसेनेनं २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून वेगळं होत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. मात्र या सरकारचं नेतृत्व नेमकं कोणाच्या हाती आहे, असा प्रश्न विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. तसंच महाविकास आघाडीच्या सरकारची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचाही आरोप केला जातो. विरोधकांच्या या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर (Cm Uddhav Thackeray On Bjp) दिलं आहे.

सत्तेचं केंद्रीकरण मुख्यत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या हाती झाल्याचा आरोप करण्यात येतो, या आरोपावर तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना ‘लोकसत्ता’च्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘मी अशा आरोपांचा विचारही करत नाही. सरकार उत्तम चाललं आहे. अगदी पवारसाहेबांबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणे ते मार्गदर्शन करत असतात. त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होती. मात्र त्यांच्या वागण्यात कसलाही रूबाब नसतो. ते मुद्देसूद बोलतात, आमच्या थोड्याफार इकडच्या-तिकडच्या गप्पा होतात. तिन्ही पक्ष मिळून चांगलं काम करत आहोत. महाविकास आघाडीत एकत्र हेच सूत्र आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Uddhav Thackeray: ‘असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत’, मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

शिवसेना आमदारांच्या नाराजीवर भाष्य

निधीवाटपात आमच्यावर अन्याय केला जातो, असं म्हणत शिवसेनेच्या काही आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सत्ता स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात निधी मिळण्यावरून आमदारांच्या तक्रारी होत्या. मात्र त्या तक्रारी सर्वपक्षीय आमदारांच्याच होत्या. कारण करोना संकटामुळे राज्याचं अर्थचक्र थांबलेलं होतं,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना आढावा बैठकीदरम्यान पेट्रोल-डिझेलचे कर कमी करण्यावरून महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेबाबत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. करोनाच्या आढावा बैठकीत राजकीय टीका-टिपण्णी अनपेक्षित होती, असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here