उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर असलेले बेकायदा भोंगे आणि लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी २६ एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ५३ हजार ९४२ भोंगे उतरवण्यात आले असून ६०,२९६ भोंगे हे आवाज नियमानुसार असल्याचे दिसले, असे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विशिष्ट धर्माला लक्ष्य न करता सर्व प्रार्थनास्थळांची तपासणी करण्यात येत असल्याचे प्रशांत कुमार यांनी नमूद केले. उतरवले गेलेले भोंगे हे बेकायदा होते. कोणतीही परवानगी न घेता बसवण्यात आले होते. त्याचीच तपासणी करून ही कारवाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सन २०१७मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशी अंमलबजावणी करण्याचा हा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले.