केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. यात उष्णतेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय कृती आराखड्याचा सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रसार करण्याचे आवाहन केले.
सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये १ मार्चपासून एकात्मिक रोग निरीक्षण कार्यक्रमाच्या (आयडीएसपी) अंतर्गत उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन देखरेख सुरू करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे. राज्यांच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान, व्यवस्थापन आणि क्षमता वाढविण्याबाबत जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असे भूषण या पत्रात म्हणतात.
‘आवश्यक औषधे, आयव्ही फ्लुइड्स, बर्फाची पाकिटे, ओआरएस आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी आरोग्य सुविधेच्या सज्जतेचा आढावा घेतला पाहिजे. सर्व आरोग्य सुविधांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता आणि गंभीर भागात गारवा देणाऱ्या उपकरणांचे कार्य निरंतर सुरू असल्याची खात्री केली जावी,’ असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
हे टाळा
– नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये
– विशेषत: दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे
– चहा, कॉफी किंवा मोठ्या प्रमाणात मद्यपान टाळा किंवा साखर मिसळलेले पेय टाळा
– उच्च प्रथिनेयुक्त अन्न, तसेच शिळे अन्न टाळा
– पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडून जाऊ नका
हे करा
– नागरिकांनी अधिकाधिक पाणी प्यावे
– आपले शरीर शक्यतो संपूर्ण झाकून घ्यावे
– शक्य तितके घरात राहावे
– कामगारांना कामाच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी दिले जावे
– कामगारांनी थेट सूर्यप्रकाश जाताना सावधगिरी बाळगावी
– कामगारांसाठी कामाची जागा सावलीत उपलब्ध करून द्यावी
या आजारांचा धोका
बाहेरील उच्च तापमान आणि घरातील तापमानाच्या वारंवार होणाऱ्या फरकामुळे उष्णतेचा परिणाम जाणवू शकतो. यामुळे उष्णतेशी संबंधित आजार होऊ शकतात, असे पत्रात म्हटले आहे. उष्म्यामुळे पुरळ येणे, हात, पाय आणि पायाच्या घोट्याला सूज येणे तसेच जळजळ होणे, स्नायूंमध्ये उसण भरणे, उष्माघात, चक्कर येणे या तक्रारी उद्भवू शकतात.