पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ते जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज यांच्या आमंत्रणावरून २ मे रोजी बर्लिनला भेट देणार आहेत. यावेळी ते शॉल्ज यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर डेन्मार्कचे पंतप्रधान मॅटे फ्रेडरिक्सन यांच्या आमंत्रणावरून द्विपक्षीय चर्चेसाठी ३ व ४ मे रोजी कोपनहेगनचा दौरा करणार आहोत. यावेळी दुसऱ्या भारतीय-नॉर्डिक शिखर संमेलनातही ते भाग घेणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते काही वेळ फ्रान्समध्ये थांबून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि त्यानंतर रशियाविरोधात बहुतांश युरोपीय देशांची एकजूट या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा युरोप दौरा होत आहे.
पंतप्रधान मोदी यांचा या वर्षातील हा पहिलाच दौरा असून, तीन दिवसांच्या तीन देशांच्या या दौऱ्यादरम्यान ६५ तासांच्या कालावधीत ते २५ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे.