वर्सोवा समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोणी आढळून आली. वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या गोणीची तपासणी केली असता आत एका तरुणीचा मृतदेह आढळला. वायरने गळा आवळून तरुणीची हत्या करण्यात आली होती. मृतदेह कुजला असल्याने त्याची ओळख पटविणे कठीण होते. वर्सोवा पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या. त्यावेळी गोरेगाव पोलिस ठाण्यात २६ एप्रिल रोजी सोनम शुक्ला ही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद होती. वर्सोवा पोलिसांनी सोनम राहत असलेल्या परिसरात तपास केंद्रीत केला.
तपासादरम्यान याच परिसरातील शहाजेब अन्सारी याचे सोनमसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शहाजेबला ताब्यात घेतले. प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून सोनमची हत्या केल्याची कबुली शहाजेब याने दिली.