भारतात सर्वाधिक करोना रुग्ण राजधानी नवी दिल्लीमध्ये आढळले आहेत. नवी दिल्लीत १४८५, हरियाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशमध्ये २६८ आणि महाराष्ट्रात १६९ करोना रुग्ण आढळले आहेत.
भारतातील एकूण करोना रुग्णसंख्येपैकी ८६ टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळले आहेत. दिल्लीत ४७.०४ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख २३ हजार ८६९ लोकांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.
देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये १४८५ करोना रुग्णांची नोंद झाली आहेत. मात्र, दिल्लीमध्ये एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या १८ लाख ८४ हजार ५६० वर पोहोचली आहे. तर, २६ हजार १७५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दिल्लीत शनिवारी १५२० करोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. २९ एप्रिलला दिल्लीत १६०७ करोनाबाधित आढळले होते तर २ जणांचा मृत्यू झाला होता.
देशभरात ९८.७४ टक्के रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात देशभरात २७२३ करोना रुग्ण बरे झाले आहेत.पश्चिम बंगालमध्ये रविवारी ५३ करोना रुग्णांची नोंद झाली होती. पश्चिम बंगालमधी करोना रुग्णांची संख्या २० लाख १८ हजार ३१३ वर पोहोचली आहे. देशातील गेल्या आठवड्यातील करोना आकडेवारीचा विचार करता ४१ टक्के रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं नाही ही दिलासादायक बाब आहे.