ठाणे : भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Mla Ganesh Naik) यांना पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे. कारण रिव्हॉल्वर दाखवून धमकी देणे तसेच बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हे दाखल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या गणेश नाईक यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. नाईक यांचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.

उच्च न्यायालयात जाण्यासाठी सात दिवसांचे अंतरिम संरक्षण देण्याची नाईक यांच्या वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने अमान्य केल्याने नाईक यांना अटक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक परदेशात पळून जाऊ शकतात, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी विमानतळ प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. परिणामी आमदार नाईक यांच्या अडचणींत भर पडली आहे.

Ac Local Train : प्रवाशांना धक्का; एसी लोकलच्या मासिक पासमध्ये सवलत नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट

दरम्यान, अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी गणेश नाईक हे लवकरच उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाची नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारदार महिला १९९३मध्ये वाशी सेक्टर-१७मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी नाईक वारंवार क्लबमध्ये बैठकीसाठी येत असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करत होते. सन १९९५पासून आमच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी नाईक यांनी मला पारसिक हिल येथील बंगल्यात नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यात फिरण्यासाठी गेल्यानंतरही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले, असे या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. नोव्हेंबर २००६मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल २००७मध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी न्यू जर्सी येथे राहण्यास गेले व १८ ऑगस्ट २००७मध्ये मुलाला जन्म दिला. तो दोन महिन्यांचा असताना नाईक स्वत: मला व मुलाला घेण्यासाठी अमेरिकेला आले होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, असा या महिलेचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here