नवी दिल्ली : काँग्रेससोबत सुरू असलेली बोलणी फिसकटल्यानंतर राजकीय रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर नक्की काय भूमिका घेणार याची देशभरात चर्चा सुरू होती. अखेर प्रशांत किशोर यांनी याबाबतची घोषणा केली असून मी लोकांमध्ये जाऊन खरे मुद्दे आणि लोकांच्या सुशासनाचा मार्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (Prashant Kishor Latest News)

प्रशांत किशोर यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत माहिती देताना एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘लोकशाहीत अर्थपूर्णरित्या सहभागी होण्याचा आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यात मदत करण्याच्या माझ्या प्रयत्नामुळे १० वर्षांचा चढ-उतार असणारा प्रवास झाला आहे. आता नवी सुरुवात करत असून खरे प्रश्न आणि सुशासनाचा मार्ग जाणून घेण्यासाठी लोकशाहीच्या खऱ्या मालकांकडे म्हणजेच लोकांमध्ये जाण्याची वेळ आली आहे,’ असं प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

प्रशांत किशोर हे आपल्या निवडणूक रणनीतीच्या कौशल्यासाठी देशभर ओळखले जातात. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना २०१२ च्या आसपास प्रशांत किशोर यांनी मोदी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत किशोर यांनी नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचारासाठी मदत केली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत किशोर यांचे त्यांच्यासोबत मतभेद झाले आणि किशोर यांनी वेगळी वाट निवडली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी आपल्या ‘आयपॅक’ या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील अनेक राजकीय पक्षांच्या निवडणूक रणनीतीचं काम पाहिलं. दरम्यानच्या काळात त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षात प्रवेशही केला होता. मात्र सीएए-एनआरसी कायद्याबाबत त्यांचा पक्षनेतृत्वाशी संघर्ष झाला आणि त्यांनी जेडीयूतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

राज ठाकरेंच्या सभेनंतर आता थेट गृहमंत्री मैदानात; जनतेला केलं महत्त्वाचं आवाहन

मागील वर्षभरापासून प्रशांत किशोर यांची काँग्रेस नेतृत्वासोबत पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भांत आणि रणनीतीबाबत चर्चा सुरू होती. किशोर यांनी काँग्रेसच्या वाटचालीची ब्ल्यू-प्रिंटही तयार केली होती. मात्र या ब्ल्यू-प्रिंटच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून त्यांचे काँग्रेस नेतृत्वासोबत मतभेद झाले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. आता अखेर प्रशांत किशोर यांनी बिहारमधून पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात उडी घेण्याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here