यावेळी छगन भुजबळ यांनी राज ठाकरे हे समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. राज ठाकरे हे शरद पवार यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही, असा प्रश्न विचारतात. पण मग राज ठाकरेही त्यांच्या सभेत कधीच फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तरी उभारतो. पण तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांविषयी कधीच बोलत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. आता मनसेच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, हे धादांत खोटं आहे. राज ठाकरे सांगतात तशी वस्तुस्थिती नाही. ३ एप्रिल १६८० ला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली तेव्हा लोकमान्य टिळक फक्त १३ वर्षांचे होते, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.
शरद पवार (Sharad Pawar) प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी टिळकांनी बांधली: राज ठाकरे
रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती. त्या लोकमान्य टिळकांकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा होते. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.
बाबासाहेब पुरंदरे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना पवारांनी त्रास दिला | राज ठाकरे