राज्यात आणि त्यातही मुंबईत करोनाचे रुग्ण वाढताहेत ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, वस्तूस्थिती लक्षात घेतल्यास मुंबईतील बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची तितकीशी तीव्र लक्षणे नाहीत. मुंबईत करोनाचे १ हजार रुग्ण असून त्यातील ६५ ते ७० टक्के करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सौम्य वा अतिसौम्य लक्षणे आढळून आलेली आहेत. बरेच रुग्ण उपचारांनी बरे होत असून तपासणीचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाणाही वाढत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राज्यात आतापर्यंत ३३ हजार जणांच्या करोनासाठीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात एकट्या मुंबईतच १९ हजार जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १ हजार जण करोनाबाधीत आढळले तर बाकींच्या करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत अवघ्या जगभरातून लोक येत असतात. सध्या विमानसेवा बंद असली तरी त्याआधी आलेले बरेच लोक मुंबईत आहेत. ही बाब ध्यानात घेता आणखी आठेक दिवस रुग्णसंख्या वाढती दिसू शकते. मात्र, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मुंबईत ज्या भागांत करोनाचे रुग्ण आढळले आहेत ते सर्व भाग सील करण्यात आलेले आहेत. एखादा भाग सील केला म्हणजे ती संपूर्ण वस्तीच क्वारंटाइन आहे असे समजा. या सील झालेल्या भागांत आपण युद्धपातळीवर तपासणी करत आहोत. गरजेनुसार अलगीकरण, विलगीकरण केले जात आहे. समोरून रुग्ण तपासणीसाठी येण्याची वाट न पाहता आम्ही रुग्णापर्यंत पोहचत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक दिसत असले तरी ज्यांचा मृत्यू झाला ते बहुतांश रुग्ण ६० वर्षांवरील होते वा आधीपासून अन्य व्याधींनी ग्रस्त होते ही बाब ध्यानात घ्यायला हवी, असे नमूद करताना आपल्या घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. त्यांना अधिक जपा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times