दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळस्तरीय वाटाघाटींतही हे नेते सहभागी झाले. भारतीय शिष्टमंडळात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचाही समावेश होता. ‘दोन्ही नेत्यांनी सामरिक भागीदारी, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबाबतही विचार विनिमय केला,’ असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील द्वैवार्षिक सरकारस्तरीय वाटाघाटींचे संयुक्त अध्यक्षस्थान दोन्ही नेत्यांनी भूषवले. या बैठकीला जयशंकर, डोवाल यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होत्या.
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी त्यांना भेटण्यासाठी भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने आले होते. त्यात आशुतोष आणि मान्य मिश्रा ही भावंडेही होती. हॉटेल अॅडलन केम्पिन्स्की येथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ही बालके उपस्थित होती. आशुतोषने मोदींना एक देशभक्तीपर गीत ऐकवले. त्यानंतर मोदींना त्याला ‘शाब्बास’ म्हणून दादही दिली. मान्याने पंतप्रधानांना त्यांचे चित्र भेट दिले. ‘हे चित्र मी आईच्या मदतीने काढले आहे. मोदी माझे आदर्श आहेत. आज माझे स्वप्न साकार झाले,’ अशी प्रतिक्रिया मान्याने व्यक्त केली.
युद्धात कोणीच जिंकणार नाही
‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात कोणीच विजयी ठरणार नाही. या युद्धाचा फटका सर्वांना बसेल,’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे जर्मनीचे अध्यक्ष ओलाफ शोल्झ यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.
‘या संघर्षावर वाटाघाटींच्या मार्गानेच तोडगा काढावा, अशी भूमिका भारताने युद्धाच्या सुरुवातीपासूनच घेतली आहे. या युद्धात कोणीच विजयी होणार नसून, सर्वांचेच नुकसान होणार असल्यामुळे आम्ही शांततेच्या बाजूचे आहोत. युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जगभरात अन्नधान्याची आणि खतांची टंचाई भेडसावत असल्याने प्रत्येक कुटुंबावर बोजा पडला आहे. या युद्धाचा विकसनशील देशांवरील परिणाम अधिक व्यापक आणि गंभीर आहे,’ याकडे मोदींनी लक्ष वेधले.
‘लोकशाही देश या नात्याने भारत आणि जर्मनी यांच्यात अनेक मूल्ये समान आहेत. या मूल्यांच्या आधारे गेल्या पाच वर्षांत आम्ही द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठी प्रगती साधली आहे,’ असेही मोदी म्हणाले. दरम्यान, दोन्ही देशांनी जागतिक व्यापार संघटनेत (डब्लूटीओ) सुधारणा घडविण्याविषयी कटिबद्धता व्यक्त केली. संघटनेतील अपीलीय यंत्रणेची स्वायत्तता जपण्यावरही उभय देशांचे मतैक्य झाले.