‘जबाबदार व्यक्तींनी इतिहासाबद्दल तथ्यांना धरून बोलावं. लोकमान्य टिळक यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे,’ अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज ठाकरे यांना फटकारलं आहे. तसंच महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधली आणि त्यानंतर तिथं पूजा सुरू झाली. त्यानंतर १९२५ मध्ये ही समाधी बांधली. शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नसून सर्व शिवभक्तांचं आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. खासदार होताना माझी भूमिका स्पष्ट होती की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची भूमिका ताकदीने मांडायची. आता कार्यकाळ संपल्यानंतरही ही शिव-शाहूंची भूमिका आणखी जोरदारपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.
‘राजकीय भूमिका जाहीर करणार’
खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची आगामी काळातील राजकीय वाटचाल कशी असणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ६ मे रोजी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मी मुंबई किंवा पुण्यात लोकांसमोर माझी आगामी राजकीय भूमिका काय असणार, याबाबतची घोषणा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘शरद पवार यांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे’; राज ठाकरेंचा पवारांवर घणाघात