भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाच्या पहिल्या मजल्यावरून वाहने आणि दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावते. १३ मार्चला उद्घाटन झालेल्या या पुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यापेक्षा वाहतूक कोंडीत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ‘पीएमपी’चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, महापालिका, महामेट्रो; तसेच वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडीबद्दल; तसेच त्यावरील उपाययोजनांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही प्रायोगिक बदल करण्याचे निश्चित करण्यात आले. हे बदल पुढील काही दिवसांत अमलात येतील आणि दहा ते पंधरा दिवसांसाठी लागू केले जातील. त्याचे परिणाम पाहून पुढे या बदलांना अंतिम स्वरूप दिले जाईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
असे असतील प्रायोगिक बदल…
– खिलारेवाडी आणि मेहेंदळे गॅरेज चौकाकडून आलेल्या चारचाकी वाहनांना शंकरराव जोशी मार्ग (हॉटेल निसर्ग) कर्वे रस्त्याकडे बंदी असेल. या वाहनांना नळस्टॉप चौकात येऊनच कर्वे रस्त्याकडे जावे लागेल. या रस्त्यावर केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जाईल.
– एसएनडीटी येथील एसटी महामंडळ आणि पीएमपीचा बसथांबा कर्वे रस्त्यावर दशभुजा गणपतीजवळ स्थलांतर केला जाईल. रिक्षांनाही येथे थांबण्यास बंदी असेल.
– उड्डाणपुलावरून उतरताना पौडफाट्याच्या उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका (बॅरिकेडिंग लेन) असेल. तर अभिनव (नळस्टॉप) चौकातून कर्वे रस्त्याने आलेल्या वाहनांना डाव्या बाजूने पौड रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर जाता येईल.
– व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्किंग’ सुविधा उपलब्ध केली जाईल.
– उड्डाणपुलावरून कर्वे रस्त्याकडे आल्यानंतर ‘रेस्कॉन’ कंपनीकडे वळण्यास वाहनांना बंदी असेल.
या कोंडीवर उत्तर काय ?
– पुलाच्या उभारणीनंतर दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत चिपळूणकर रस्त्यावर (विधी महाविद्यालय रस्ता) वाहनांच्या रांगा लागतात.
– अनेकदा येथे नागरिकांना दोन वेळा सिग्नलला थांबावे लागते.
– पौड रस्त्यावरून येत कलमाडी हाउसजवळ उड्डाणपूल उतरल्यानंतर जेमतेम ५०-६० मीटरवर सिग्नल आहे.
– गर्दीच्या वेळी सिग्नल लागल्यानंतर वाहनांच्या रांगा उड्डाणपुलावरही लागत असल्याचे चित्र आहे.
– ही कोंडी फोडण्यासाठी चक्राकार वाहतूक किंवा अन्य उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.