शहरात सारीचे रुग्ण वाढतच असल्याची माहिती शनिवारी समोर आली. दिवसभराच्या घटना-घडामोडींची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दिली. पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, शनिवारी दिवसभरात सारीचे २१ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी १५ रुग्ण खासगी दवाखान्यात, तर सहा रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एक जण जालना येथील आहे, तर दोन जण औरंगाबादशी संबंधित आहेत. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचा करोना आजाराशी काही संबंध आहे का, हे तपासले जाईल असे महापौर म्हणाले.
दरम्यान, करोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णांत शनिवारी कोणतीही वाढ झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळवण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. करोनाबद्दलच्या नमुन्यांचे २१ अहवाल शनिवारी प्राप्त झाले, हे सर्व अहवाल निगेटीव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, असे महापौर म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times