सौरभ बेंडाळे |नाशिक :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Raj Thackeray) यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आज राज्यभरात पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे. नाशिकमधील भद्रकाली परिसरातील छपरीची तालीम या भागात मनसे कार्यकर्त्यांनी पहाटे भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाचा (Hanuman Chalisa In Mosque) प्रयत्न केला. सातपूर भागातील मशीदसमोरही असाच भोंगा लावण्यात आला. यावेळी हनुमान चालीसा लावण्यापूर्वीच पोलिसांनी साहित्य जप्त करून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

शहरातील संवेदनशील मशिदीबाहेर पोलिसांचा पहाटे चार वाजेपासून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळपासून शहरातून २९ मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबईत कडेकोट सुरक्षा; पोलीस आयुक्त ऑन फिल्ड

सातपूरच्या रजवीया मशिदीसह भद्रकाली परिसरातील काही मशिदींची अजान पहाटे भोंग्यावरून केली गेली नाही. शहरातील इतर मशिदींच्याही भोंग्याचा आवाज मर्यादित असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील अनेक भागात तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here