मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगरातील काही तरूण कंजरवाडा येथे दुचाकीने आले. त्यानंतर लक्ष्मीनगरातील तरूणांनी कंजरवाड्यातील तरूणांशी वाद घातला. यानंतर वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले. यात चार ते पाच दुचाकींची तोडफोड सुध्दा करण्यात आली. कंजरवाड्यात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. नंतर जमावाला पांगवले.
दगडफेकीवेळी एमआयडीसी पोलिसांच्या वाहनांचे काच फुटून नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून नुकसानग्रस्त वाहने ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत कंजरवाडा भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रात्री धरपकड मोहीम राबवत ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे वाद…
श्रीराम नवमीच्या दिवशी सम्राट कॉलनी येथे मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीदरम्यान दिव्यकांत बागळे या युवकासह त्याच्या आईला देखील लक्ष्मी नगरातील तीन ते चार तरूणांनी मारहाण केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. लक्ष्मी नगरातील तीन ते चार तरूण मंगळवारी कंजरवाड्यात आल्यावर पुन्हा वाद पेटला आणि यातूनच ही दगडफेक झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.