नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मालेगावात आज पहाटेची अजान भोंग्यविना देण्यात आली. शहरातील जामा मशिदीसह बहुतांश मशिदींनी सकाळची अजान देतांना भोंग्याचा वापर केला नाही. सध्या मालेगावची परिस्थिती नियंत्रणात असून मनसे कार्यकर्ते भूमिगत झाले असून पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर आहे.
नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. भद्रकाली पोलिसांनी जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. छपरीच्या तालीम परिसरातील श्री. जबरेश्वर या छोट्या मंदिरासमोर हनुमान चालीसा लावून कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी साऊंड सिस्टमसह इतर साहित्य जप्त केले. सर्वच मशिदी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे अनेक मशिदीवरील भोंगे आज वाजले नाही. तर काही ठिकाणी कमी आवाजात अजान झाली. अजान नोटीस आणि पोलीस बंदोबस्तामुळे नाशिक शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. नाशिक शहरात केवळ दोन मशिदीमधून भोंग्याद्वारे अजान पठाण केला असल्याचा पोलिसांनी धावा केला आहे.