– स्वाती भट

तरुण नायक-नायिका, त्यांचे रुसवेफुगवे, कॉलेजवयीन प्रेम, रोमान्स आणि लग्न याभोवती मालिकांचं कथानक गुंफलं जायचं. पण सध्या मालिकाविश्वामध्ये एक वेगळाच ट्रेंड बघायला मिळतोय. मालिकेतील मुख्य स्त्री व्यक्तिरेखा ही तरुण किंवा अल्लड वयातील दाखवण्याचा ट्रेंड जुना झाला. उलट, सध्या मध्यमवयीन अभिनेत्री या मालिकांमधील मुख्य नायिका म्हणून दाखवल्या जात आहेत. या निमित्तानं मालिकाविश्वात अनेक आवडत्या अभिनेत्रींचं पुनरागमन झाल्यानं प्रेक्षकही खुश आहेत.

मालिका बघणाऱ्या प्रेक्षकवर्गामध्ये ३५-५० वयोगटातील महिलांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या वयोगटातल्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील अशा अभिनेत्री मालिकेत असणं, ही मालिकांची जमेची बाजू ठरते. तसंच एक काळ गाजवलेल्या अभिनेत्रींना बऱ्याच कालावधीनंतर अनोख्या भूमिकेत पाहता येत असल्यामुळे प्रेक्षकसुद्धा मालिकेत रमतात. मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यातसुद्धा त्याच वयोगटातल्या असल्यानं त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अधिकाधिक वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या आणि प्रभावी वाटतात. तसंच नवीन चेहऱ्यांऐवजी प्रेक्षकांना परिचित असलेल्या अभिनेत्रींना मुख्य भूमिकेत पाहताना त्याच्याशी प्रेक्षक अधिक जोडले जातात.

मालिकेत मध्यमवयीन व्यक्तिरेखा दाखवताना कथानकाचे अनेक कंगोरे उलगडता येतात, असं लेखकांचं मत आहे. संसारात, कुटुंबात रमलेल्या नायिकांपासून ते मुलं मोठी होत असताना पुन्हा स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहणाऱ्या किंवा करिअरची घडी पुन्हा बसवणाऱ्या नायिका अशा वैविध्यपूर्ण विषयांचा विचार सध्याच्या मालिकांमध्ये मांडला जातोय. यामुळे मुख्य कथानकाबरोबरच नायिकेचे आई-वडील, ऑफिस किंवा तिच्या मुलांच्या आयुष्याभोवतीचं विश्व अशा अनेक उपकथानकांचासुद्धा समावेश करता येतो.

‘!’ या मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही तीन तरुण मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेत हेमांगी कवी आणि नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये उर्मिला कोठारे एका लहान मुलीच्या आईची भूमिका निभावत आहे.

केवळ कुटुंब आणि संसार याभोवती कथानक न फिरता मध्यमवयातील प्रेमकहाणीसुद्धा ‘अजूनही बरसात आहे’सारख्या मालिकांमध्ये दाखवण्यात आली. सध्याच्या परिस्थितीचं निरीक्षण केलं तर लग्नाचं वय पुढे सरकत आहे. आधी करिअर, मग प्रेम-लग्न वगैरे असा विचार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या सगळ्याचं प्रतिबिंब मालिकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळेच मध्यमवयीन अभिनेत्री मुख्य भूमिकांमध्ये दाखवल्या जात आहेत. याचं प्रमाण येत्या काळात वाढेल, असं तज्ज्ञ सांगतात.

नायकसुद्धा मध्यमवयीनमालिकेतील प्रमुख जोडी ही मध्यवयीन असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे अभिनेत्रींसह मध्यमवयीन अभिनेत्यांसुद्धा मालिकांमध्ये अनोख्या धाटणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्या वर्गातील पुरुष प्रेक्षकांना मालिकेकडे वळवण्यासाठी हा बदल उपयोगी ठरताना दिसतोय.

मध्यमवयीन स्त्रीला मुख्य भूमिकेत ठेवून मालिका साकारण्याचा हा सकारात्मक बदल खूप वर्षांनी बघायला मिळतोय. त्याबाबतीत ‘आई कुठे काय करते!’ ही मालिका ट्रेंड सेंटर ठरल्याचं मला वाटतं. या वयोगटातील रोमँटिक दृश्य़ लिहिताना अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये अवखळपणा आणि नुसतेच प्रेमळ संवाद असं असून चालत नाही. त्याचवेळी तरुणवर्गापासून दुरावा असणारं कथानक असूनसुद्धा चालत नाही. प्रॅक्टीकल तरीही नात्यांना बांधून ठेवणारं असं कथानक मांडावं लागतं.

– मुग्धा गोडबोले, लेखिका (आई कुठे काय करते)

‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका आईवर आधारित आहे, त्यातही ती रहस्यमय प्रकारात मोडणारी आहे. मी आजपर्यंत कायम मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आई किंवा अन्य कोणत्याही वयाची मध्यवर्ती आणि सशक्त कथानक असलेली भूमिका असावी असा विचार मी करते. एक काळानंतर तुम्हाला तुमचं वयसुद्धा स्वीकारावं लागतं; परंतु त्या वयातल्या भूमिका असतात. त्या नाटक-सिनेमांमध्ये जास्त असायच्या. आता मालिकाविश्वातसुद्धा असं कथानक दाखवलं जातंय.

– मधुरा वेलणकर-साटम, तुमची मुलगी काय करते

50 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here