विशाखापट्टणमः करोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन आहे. या संकटाच्या परिस्थितीत पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी झटून काम करत आहेत. महिला डॉक्टर, महिला वैद्यकीय कर्मचारी असो की महिला पोलीस आणि प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी हे सर्वच कुटुंब मागे ठेवून करोनाविरोधी लढाईत मैदानात उतरले आहेत. अशीच एक महिला अधिकारी विशाखापट्टणममध्ये आपल्या २२ दिवसांच्या बाळाला घरी सोडून या संकटाच्या काळात मैदानात उतरली आहे. आणि या रणरागिणीचं नाव आहे जी. श्रीजना.

जी. श्रीजना या महापालिकेच्या आयुक्त आहेत. २२ दिवसांपूर्वीच त्यांची प्रसूती झाली. त्यांना मुलगा झाला. याकाळात मातेला विश्रांतीची गरज असते. पण बाळंतपणाचं कौतुक सोडून ही माऊली जनतेच्या सेवेत दाखल झाली आहे. तेही आपल्या तान्हुल्याला घरी सोडून. कुटुंब आणि ममतेच्या आधी त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे. या लढाईत त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना साथ दिलीय.

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. अशा परिस्थिती फार दिवस घरी बसणं आपल्याला योग्य वाटलं नाही. त्यातच एका उच्च आणि महत्त्वाच्या पदावर असल्याने जबाबदारी अधिक आहे. आणि अशा संकटाच्या काळात ही जबाबदारी आणखी वाढते. यामुळे मी कामावर तातडीने रूजू झाले आहे. बाळाला दूध पाजण्यासाठी मी प्रत्येक चार तासांनी घरी जाते. दरम्यानच्या काळात आपली आणि पती बाळाची काळजी घेतात, असं जी. श्रीजना यांनी सांगितलं. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका संयुक्तपणे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शहरात पूर्ण स्वच्छता राहिल याची काळजी घेण्यात येत आहे. गरीबांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. विशाखापट्टणममध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत. या आपत्कालीन स्थितीत कर्तव्य महत्त्वाचं आहे. नागरिकांना पुरेसं आणि शुद्ध पाणी पुरवणंही गरजेचं आहे. करोनाविरोधातील या मोठ्या लढाईत आपली भूमिका छोटी आहे. हे नम्रपणे सांगते. आणि या लढाईत संपूर्ण कुटुंबाची मला साथ आहे. म्हणूनच या कर्तव्यात मी कुठेही कमी पडणार नाही, असा दृढ विश्वास महापालिका आयुक्त जी. श्रीजना यांनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here