‘मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी वढू बुद्रुक याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती स्थापन केली याची कल्पना तुम्हाला आहे का?’ असा प्रश्नही पवार यांना आयोगासमोर विचारण्यात आला. या प्रश्नावर ‘मी प्रतिज्ञापत्रावर जे काही म्हटले तेवढंच मला बोलायचं आहे,’ असं उत्तर पवार यांनी दिले. कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेबाबत मला प्रसारमाध्यमामांध्ये आलेल्या बातम्यांमधूनच कळले, असंही पवार म्हणाले.
प्रश्नांची सरबत्ती आणि पवारांची उत्तरे; नक्की काय घडलं?
शरद पवार यांनी हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याबाबतही त्यांना चौकशी आयोगासमोर प्रश्न विचारण्यात आला. ‘कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या आधी एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेला तपास हा पोलिस खात्याला काळिमा आहे, असे वक्तव्य आपण प्रसारमाध्यमांत केले होते, ते बरोबर आहे का?’ असं पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, ‘एल्गार परिषदमध्ये जे लोक उपस्थित नव्हते त्यांनाही पुणे पोलिसांनी आरोपी केले, हे चुकीचे आहे, असे मी बोललो होतो.’
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि पुणे पोलिसांनी त्याबाबत केलेला तपास याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एसआयटी नेमावी, असे मत आपण मांडले होते का? या प्रश्नावर पवार यांनी हो असे उत्तर दिले. तसंच कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेबाबतची माहिती मला प्रसारमाध्यमांवरील बातम्यांमधून कळली, हे खरे आहे. तसं मी माझ्या ऑक्टोबर-२०१८च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. पुणे ग्रामीणमध्ये शिक्रापूर पोलीस ठाणे आणि पिंपरी पोलीस ठाणे अशा दोन ठिकाणी गुन्हे नोंद झाल्याची माहिती मला कळाली, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.