पिगी बँकेतील पैशांतून दिला मदतनिधी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

एकीकडे टाटा, विप्रो, रिलायन्स यांसारखे उद्योग समूह पुढे येऊन केंद्र आणि राज्य सरकारला मदतीचा आधार देत असताना दुसरीकडे शहरातील दोन चिमुरडींनी स्वत:च्या पिगी बँकेतील पैसे मदतनिधी म्हणून दिला आहे.

खाऊचे पैसे पिगी बँकेत साठवून त्याचे काय करायचे, याचे स्वप्नरंजन करणारे हे हात आता करोनाविरोधात मदतीला पुढे आहेत. आपल्या पिगी बँकेतून पलक (वय दहा) आणि कुमुद (वय सहा) या दोघींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीकडे आर्थिक मदत सोपविली आहे.

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’, ही वाक्ये सतत या दोघींच्या कानावर पडत होती. घरात संस्कारमय आणि देशाभिमानी वातावरण. त्यामुळे देशासाठी जमेल तेव्हा मदत करायची, ही शिकवण दोघींनाही. दरम्यान, करोनारूपी संकट संपूर्ण मानव जातीपुढे उभे येऊन ठाकले. घरातील वडीलधारे करोनाबाबत चर्चा करायचे. त्यातून या दोघींना या आजाराची भीषण दाहकता जाणवली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पलक जयंत दंडारे आणि कुमुद जयंत दंडारे या बहिणींनी स्वत:च्या गुल्लकमध्ये असलेली रक्कम देण्याचा निर्धार केला. नुसताच निर्धार केला नाही तर ताडदिशी तो आईवडिलांपुढे बोलून दाखविला. दोघींच्या या निर्णयावर आनंद व्यक्त करावा की आश्चर्य काहीच कळेनासे झाले. इतक्या लहान वयात त्यांनी दाखविलेल्या जबाबदारीचा अभिमानदेखील पालकांच्या उरी दाटून आला. अखेर ठरले आणि रोज पै-पै टाकून भरलेले गुल्लक फोडण्यात आले. ज्यातून तब्बल ६,७७३ रुपये निघाले. त्यात वडिलांनी स्वतःजवळचे दोन हजार रुपये टाकले. एकूण ८,७७३ इतकी मदतराशी अयोध्यानगर कार्यवाह नितीन एदलाबादकर यांच्या सुपूर्द करण्यात आली. ती त्यांनी ताबडतोब लोककल्याण समितीला पोहोचती केली.

पलक आणि कुमुदप्रमाणेच देशातील कानाकोपऱ्यातील मुले करोनाशी लढण्यासाठी सरसावली आहेत. कुणी वाढदिवसाला आलेले पैसे पीएम सहाय्यता निधीला देत आहे, तर कुणी खाऊसाठी गोळा केलेले पैसे मदतीसाठी देऊ करत आहेत. देश संकटात असताना अल्पवयातच सामाजिक भान ठेवून समाजाप्रती संवेदनशीलता जपणाऱ्या दंडारे भगिनींसह लहानशा हाताने मोठा आधार देणाऱ्या सर्व छोट्या उस्तादांवर समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here