देशात सध्या दिलासा घोटाळा; गुन्हे फक्त आमचेच सिद्ध होतात : संजय राऊत – shivsena sanjay raut has indirectly questioned the decision of the court about mp navneet rana and ravi rana
पुणे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करत राज्य सरकारला फटकारलं आहे. याबाबत बोलताना संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी थेट न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘या राज्यात किंवा देशात सध्या जो दिलासा घोटाळा सुरू आहेत त्यामध्ये अनेक कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप हे फक्त आमच्यावरील सिद्ध होतात,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. मात्र परप्रांतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवून देणार नाही, असा इशारा भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारल्यानंतर संजय राऊत यांनी बोलणं टाळलं आहे. मोठी बातमी: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
राज ठाकरेंनी जिथं सभा घेतली त्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राऊत म्हणाले की, ‘तुमची माहिती चुकीची आहे. या मैदानावर काल झालेली सभा पहिलीच नव्हती. औरंगाबादमधील मैदानावर याआधी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत.’
हे सरकार बहुजनांचं असल्याचा दावा खोटा आहे, असं म्हणत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. या टीकेवर आता संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ‘आमच्यावर टीका करणाऱ्यांची भूमिका काय आहे, त्यांचं राजकारण आणि समाजातील स्थान काय आहे? त्यांनी उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं करू नये,’ अशा शब्दांत राऊत यांनी गोपीचंद पडळकर यांना फटकारलं आहे.
राज यांचं मतपरिवर्तन हा पीएचडीचा विषय, योगींचं कौतुक केल्यानंतर राऊतांचा टोला