कर्ज न फेडल्याचे कारण पुढे करून कुरारमध्ये एका तरुणाचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल करण्यात आली. बदनामी झाल्यामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरार गावामध्ये संदीप कोरगावकर हा आपल्या पत्नीसोबत राहत होता. संदीप याला १८ एप्रिलपासून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून कर्ज फेडण्याबाबत फोन येऊ लागले. आपण कर्ज घेतल्याचे नसून ते फेडणार कसे, असे संदीप सांगत असे. मात्र याचदरम्यान संदीप याची मॉर्फिंग केलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना पाठविण्यात आले. संदीप याने कर्ज घेतल्याचे संदेशही सोबत पाठविण्यात आले. यावर संदीपने कुरार पोलिस ठाण्यात लेखी अर्जही दिला होता. परंतु बदनामीमुळे संदीप अस्वस्थ होता. त्यातच निनावी फोनचा ससेमिरा त्याच्या मागे सुरूच होता. यामुळे तणावामध्ये येऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, मृत तरुणाच्या भावाच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी नाहक त्रास देणाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.