यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की, मनसेचे राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेच्या आधी मराठी मुद्द्यावर भूमिका घेत उत्तरप्रदेशवर हल्ला चढविला. त्यानंतर पक्ष स्थापनेच्या वेळी सब को साथ लेगें चलेंगे, नंतर मोदींची प्रशंसा करत भूमिका बदलवली. त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ आणि आता भोंग्याचा मुद्दा अशा पध्दतीने राज ठाकरे यांची भूमिका नेहमी बदलत असते. आता पुन्हा कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आपली भूमिका बदलवली आहे. मात्र, भोंग्याच्या मुद्द्यावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यात राज ठाकरे अपयशी ठरले असून ठेंगा मिळाला असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.
ओबीसी आरक्षणाबाबत नुकताच सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे. १५ दिवसात निवडणुकांची तयारी कशी होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत सरकार बारकाईने विचार करत आहे. काल मंत्रीमंडळात झालेल्या ओबीसी नेत्यांसोबत बैठक झाली. आरक्षणाबाबत काय पर्याय काढता येतो. यावर विचारविनिमय व चर्चा झाल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, ही फक्त शिवसेनेची नाही तर सर्व पक्षाची मानसिकता आहे. जिल्हृयात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कशा लढेल? यावर विचारले असता, निवडणुकांची तारीख तर ठरू द्या त्यानंतर ठरवू, अशी प्रतिक्रिया दिली.
तुमच्याकडे तुपाशी अन् आम्ही उपाशी…
जळगाव जिल्ह्यात कृषी विभागात केवळ ५४ टक्के एवढेच मनुष्यबळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे रखडली असल्याची खंत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. इतर जिल्हृयात म्हणजेच नाशिकचे उदारहण घेतले तर नाशिकमध्ये ९५ टक्के एवढा स्टाफ आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असून विभागीय आयुक्तांकडे विनंती केली आहे. सरकार जरी आमच असलं तरी शेतकरी हा सुध्दा आमचाच आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याकडे बोट ठेवत तुमच्याकडे तुपाशी आणि आम्ही उपाशी असे कदापि सहन करणार नाही, असा इशारा यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.